न तूके (कोणाशी व कोणत्याही स्वरूपाची तुलनाच न होणारा) म्हणून तुकाराम हे नामकरण : हभप डॉ जयवंत महाराज बोधले



    धनश्री परिवार आयोजित आरती मंडप प्रांगण(मनमाडकर), पंढरपूर येथील  धनश्री प्रवचनमालिकेच्या तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील द्वितीय दिवशी श्री संत तुकाराम महाराज यांचे नामकरण सोहळा प्रतिपादन करत असताना स्वयंम श्री भगवान पांडुरंग परमात्मा व रुक्मिणी माता यांनी नामकरण करताना संत तुकाराम महाराज यांच्या सोबत कोणाशीच व कोणत्याही स्वरूपाची तुलनाच होऊ शकत नसल्याने तुकाराम हे नामकरण केल्याचे श्री संत निळोबराय महाराज यांच्या

*बाळवेष घेऊनि श्रीहरी भेटला । विधिचा जनिता तोचि आठवा हा दिधला । तेणें ब्रहमानंदें प्रेमा डोलविला । न तुके म्हणुनी तुका नामहं गौरविला!!

हा संदर्भ देत  श्री संत माणकोजी बोधले महाराज यांचे वंशज हभप डॉ जयवंत महाराज बोधले तुकाराम या नावाचं महत्व विशद  केले.
            पाच दिवसीय प्रवचन मालिकेच्या द्वितीय दिवशी शुभारंभी  प्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती चे सदस्य हभप श्री  ज्ञानेश्वर ( माऊली ) महाराज देशमुख जळगावकर , सु.रा.परिचारक पतसंस्थेचे चेअरमन श्री प्रकाश पाटील , श्री केदार साहेब सांगोला, श्री लक्ष्मण आबा पवार ( मा.व्हा.चेअरमन तथा संचालक श्री विठ्ठल सह.साखर कारखाना) श्री सचिन पाटील (संचालक श्री विठ्ठल सह.साखर कारखाना) , श्री डॉ एकनाथ बोधले (तालुका वैद्यकीय अधिकारी)श्री हभप निरंजन महाराज मनमाडकर,धनश्री परिवार चे प्रमुख मा.श्री. शिवाजीराव काळुंगे सर, सौ.शोभाताई काळुंगे( चेअरमन धनश्री महिला पतसंस्था) ,सौ. राजलक्ष्मी गायकवाड काळुंगे (सी इ ओ, सीताराम आणि आष्टी शुगर ) , श्री रावसाहेब तात्या पाटील (भोसे) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
    तुका झालासे कळस या विषयावरील आयोजित प्रवचन मालेतील द्वितीय पुष्प गुंफताना हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी तुकाराम महाराजांच्या चरित्राचे तात्विक चिंतन करताना तुकाराम महाराज यांच्या जन्मला का अवतार म्हणावे हे प्रतिपादन करताना सामान्य मनुष्याला कर्माचे बंधन असते , संताना कर्माचे बंधन नसते असे सांगताना संताना नीतीचे ,धर्माचे बंधन नसते म्हणून त्यांचा अवतार असतो असे प्रतिपादन केले.
           सामान्य मनुष्याचा जन्म कर्म प्रेरित असतो   हा सिद्धांत मांडताना उपादान कारण व निमित्त कारण या वेदांत शास्त्रातील प्रक्रिया विविध दाखले देत मडक्याला मातीचा , कपड्याला तंतूंचा , अग्निला उष्णतेचा आणि पाण्याला ओलाव्याचा त्याग करता येत नाही म्हणजेच सोडता येत नाही अगदी त्याच पद्धतीने मनुष्याला कर्म सोडता येत नाही असे सांगत कारणाशिवाय कार्य घडूच शकत नाही हा तात्विक युक्तिवाद सहज सोप्या भाषेत हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी मांडला.
     इहलोकात आल्यानंतर काय करायचे आहे हे ठरवून जे येतात तो संताचा अवतार तर इथे आल्यानंतर काय करायचे ते ठरवतात ते सामान्य जीव असतो , असाही मार्मिक विचार व्यक्त केला तसेच सांसारिक या जगाकडे सत्यत्व बुद्धीने पाहतो , विरक्त या जगाकडे अनित्व बुद्धीने पाहतो , ब्रम्हज्ञानी जगाकडे मिथ्यत्व बुद्धीने पाहतो तर संत या जगाकडे ब्रम्हत्व अर्थातच समत्व बुद्धीने पाहत असतो त्यामुळेच बालवयापासूनच संत तुकाराम महाराज सर्वांकडे ब्रम्हत्व बुद्धीने पाहत असल्याने व त्याच्या सेवाभाव वृत्तीने ते लहानापासून थोरांपर्यंत सर्वांचे प्रिय होते,ते सर्वांच जवळ असावे असे वाटत होते असे तुकाराम महाराज यांच्या बालचारित्र वर्णन करताना सांगितले.
       अखेरीस श्री बोल्होबा महाराज यांनी बाल तुकाराम महाराज यांना इंद्रायणीच्या काठावर केलेला उपदेश
देणे घेणे उदिम हातोटी ! नफा तोटा असावी दृष्टी !! .     हे सांगताना वडिलांनी  मुलाशी वयाच्या कोणत्या टप्प्यात कसे वागावे हा खूप मोठा विचार व्यक्त केला व  अखेरीस श्री बोल्होबा महाराज यांनी इंद्रायणी चे खळखळणारे पाणी म्हणजे मुलांचे जीवन असते तर मावळतीचा सूर्य म्हणजे वडिलाचे जीवन आहे ,हा प्रसंग हभप डॉ जयवंत महाराज यांनी सांगताना भरगच्च भरलेला सभामंडप भावविभोर झाला होता..

सूत्रसंचालन प्रसिद्धी कवी श्री इंद्रजित घुले यांनी केली.
सदर प्रवचन माला एल. आय. सी. ऑफीस समोरील मनमाडकर यांच्या आरती मंडप प्रांगण येथे संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू असून सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन धनश्री परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed