भक्तावर होणारा अन्याय देव सहन करत नाही..

एक वयस्कर साधू महाराज पावसात देवाचे नाव घेत घेत आनंदाने भिजत चालले होते. समोरच एका मिठाईच्या दुकानात कढईमध्ये गरम दूध उकळत होते आणि बाजूला गरमागरम ताजी जिलेबी तळली जात होती. हे बघून आपसूकच साधूचे पाय काही वेळ त्या दुकानासमोर थांबले. बहुदा पोटातील भूक तसे करायला सांगत होती. इच्छा खूप होती, पण काय करणार, शरीराला पोट होते, पण अंगावरील कपड्याला खिसाच नव्हता. साधूकडे एक रुपयाही नव्हता.
बहुधा दुकानदाराला ह्याची जाणीव झाली असावी. त्या सदहृदयी दुकानदाराने आदराने साधूला जवळ बोलावले आणि एक ग्लास भरून गरमागरम दूध आणि एक प्लेट गरमागरम जिलेबी वाढली. साधूने मोठ्या आनंदाने दूध आणि जिलेबी खाल्ली आणि दुकानदाराला धन्यवाद देऊन मोठ्या भक्तीने आकाशाकडे बघितले. आणि ईश्वराचे आभार मानले आणि दुकानातून प्रस्थान केले.
पोट भरल्याने साधूचे मन प्रफुल्लित झाले होते आणि जगाची फिकीर न बाळगता त्याने रस्त्यावर देवाचे भजन गायला आणि नाचायला सुरू केली.
समोरून एक नवविवाहित जोडपे येत होते आणि इकडे साधू नाचत असताना साधुचा पाय रस्त्यावरील डबक्यात पडला ज्यात चिखलाचे पाणी होते आणि ते चिखलयुक्त पाणी त्या जोडीतील तरुण बाईच्या अंगावर उडाले. तिची साडी, दागिने सर्व घाण झाले. हे बघून त्या बाईच्या नवऱ्याला भयंकर राग आला आणि साधूला म्हणाला, “म्हाताऱ्या तुला डोळे दिले नाहीत का? माझ्या बायकोच्या अंगावर चिखल उडवायची तुझी हिम्मत कशी झाली?”
त्याला भयंकर राग आला आणि तो साधूच्या अंगावर धावून गेला. आजूबाजूला लोक हा प्रकार बघत होते पण कोणी काही बोलले नाही. त्याच्या बायकोने त्याला आवरायचा प्रयत्न केला पण त्याच्या डोळ्यातील राग बघून मागे सरकली. त्या युवकाने पुढचा काही विचार न करता साधूच्या मुस्काटीत एक जोरात ठेऊन दिली. बिचारा साधू तोल जाऊन त्या खड्ड्यात पडला, त्याला खड्ड्यात पडलेला बघून तो युवक हसला आणि बायकोचा हात धरून चालू लागला.
इकडे साधूला काहीच कळले नाही. त्याने फक्त वरती आकाशाकडे बघितले आणि ईश्वराला म्हणाला, “वा ईश्वरा – तुझी लीला अगाध आहे. एका क्षणाला गरमागरम दूध आणि जिलेबी देतो आणि दुसऱ्या क्षणाला कानाखाली झापड, पण असो तू जे काही मला देतोस ते मला पसंत आहे.”
इकडे ते नवविवाहित जोडपे त्यांच्या रस्त्याच्या पलीकडे असलेल्या घरी पोचले. बायकोशी हसत हसत गप्पा मारत नवरा वरच्या मजल्यावर दरवाजा उघडायला निघाला. पाऊस पडल्याने जिना ओला झाला होता आणि त्या युवकाचा पाय घसरला. हे बघून ती बाई जोरजोरात ओरडू लागली आणि लोकांना मदतीला बोलवायला लागली. लोक मदतीला आले पण उशीर झाला होता. जोरात आपटल्याने त्या युवकाचे डोके फुटले होते आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
साधू समोरुनच चालले होते. त्यांना बघून लोक कुजबुज लागले की नक्कीच ह्या साधूने त्याला शाप दिला असणार. म्हणून ह्या युवकाचा मृत्यू झाला, ही कुजबुज ऐकून काही मस्तीखोर युवकांनी साधूला घेरले आणि म्हणाले, “तुम्ही कसले ईश्वराचे भक्त आहात? ज्यांनी फक्त एक थोबाडीत मारली म्हणून असला भयंकर शाप दिलात! ईश्वराचे भक्त तर दयाळू असतात, असे भयंकर तुम्ही कसे केलेत?”
हे ऐकल्यावर साधूने सांगितले की, “ईश्वराशपथ मी त्या युवकाला शाप दिला नाही”
“जर तुम्ही शाप दिला नाही तर मग ह्या युवकाचा अकाली मृत्यू कसा झाला?”, एका व्यक्तीने विचारले.
हे ऐकून साधूने जमलेल्या गर्दीला विचारले की “जे काही घडले त्या संपूर्ण प्रसंगाचे कोणी प्रत्यक्ष दर्शक आहेत का?”
हे ऐकून एक व्यक्ती पुढे झाली आणि म्हणाली, की “हो जे काही घडले त्याचा मी प्रत्यक्षदर्शी आहे.”
साधू म्हणाला, “माझ्या पायाने जो चिखल उडाला तो ह्या युवकाच्या अंगावर उडाला होता का?”
व्यक्ती म्हणाली “नाही, मात्र तो चिखल त्या बाईच्या अंगावर जरूर उडाला होता”
मग साधूने विचारले, “जर युवकाच्या अंगावर चिखल उडाला नव्हता तर मग त्याने मला का मारले ?”
व्यक्ती म्हणाली, “तो युवक या महिलेचा नवरा व प्रेमी होता आणि महिलेच्या अंगावर चिखल उडालेले त्याला सहन झाले नाही. म्हणून त्याने तुम्हाला मारले.”
हे सर्व ऐकून साधू मोठ्याने हसला आणि म्हणाला,”ईश्वराशपथ मी ह्या युवकाला शाप दिला नाही. पण नक्की ईश्वराचे माझ्यावर प्रेम आहे. ह्या बाईचा प्रेमी सहन करू शकला नाही, तर माझ्यावर प्रेम करणाऱ्या ईश्वराला हे सहन कसे होईल, की कोणी मला अकारण मारावे…?
ईश्वर एवढा शक्तिशाली आहे की जगातील मोठ्यात मोठा चक्रवर्ती सम्राट पण ईश्वराच्या कोपाला घाबरतो. ईश्वराची लाठी दिसत तर नाही, पण जेव्हा ती पडते तेंव्हा मोठा आघात करते. त्या माराची तीव्रता फक्त आपले चांगले कर्मच कमी करू शकतात. म्हणून चांगले कर्म करावे.”
हे सांगून साधू तेथून निघून गेला.
*कुणाचे चांगले करता आले नाही तरी चालेल, शांत रहा. पण कुणाचे वाईट करण्याचा, विनाकारण बदनामी करण्याचा विचारही करू नका.
Post Comment