
हैद्राबाद गॅझेट प्रत
आजच्या शासन निर्णयामुळे (जीआर) आधीपासून ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना त्याच्या वैधतेसंदर्भात मोठा फायदा होणार आहे. तसेच, नवीन अर्जदारांसाठीही मार्ग सुलभ झाला आहे. एखाद्या गावात जर आधी कुणाचा कुणबी म्हणून दाखला निघाला असेल, तर त्या गावातील त्यांच्या नातेवाईकांनाही त्याचा लाभ होऊ शकतो. शपथपत्राद्वारे ‘कुणबी’ नोंद करून पुढील प्रक्रिया करता येईल. त्यामुळे हे प्रमाणपत्र सर्वांसाठी सरसकट लागू होणार नसले तरी, मोठ्या संख्येने मराठा समाजातील लोकांना ओबीसी प्रवर्गाचा लाभ मिळू शकेल, असे प्रथमदर्शनी वाटते.
आज आंदोलन थांबवणे हेही तितकेच आवश्यक होते. ग्रामीण भागातील सामान्य, भोळ्याभाळ्या लोकांवर पोलिस कारवाईचा धोका निर्माण झाला होता. न्यायालयाचा आधार घेऊन केंद्र सरकारने एक रणनीती आखली होती, परंतु ती जरांगे पाटलांनी धाडसाने आणि संयमाने उधळून लावली.
जर शासनाने दिलेल्या जीआरमध्ये कोणतीही फसवणूक केली, तर जरांगे पाटील पुन्हा नव्याने लढा देतील, आणि मराठा समाज पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेऊन ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील — यावर मला पूर्ण विश्वास आहे.
मी स्वतः फडणवीस यांचे आभार तोपर्यंत मानणार नाही, जोपर्यंत हा निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतून पार पडून प्रत्यक्ष अंमलात येत नाही.
मराठा समाजाचे खरे नेतृत्व करणारे श्री. मनोज जरांगे पाटील यांचे मात्र मन:पूर्वक आभार. त्यांचा संघर्ष आणि नेतृत्व वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लढा चालू ठेवण्याचा निर्धार आम्ही कटिबद्धपणे करतो.





