
रामायणातील प्रत्येक प्रसंग हा केवळ कथा नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संस्कार आहे. अशाच एका सूक्ष्म पण अत्यंत गहन अर्थ असलेल्या प्रसंगातून आपल्याला आजही मोठा बोध मिळतो.
जेव्हा रावण सीता मातेचे अपहरण करून तिला लंकेकडे घेऊन जात होता, तेव्हा सीता मातेने वाटेत आपली आभूषणं खाली टाकली. यामागे एकच हेतू होता—राम आणि लक्ष्मणांना आपण कोणत्या दिशेने नेली जात आहोत, याचा माग कळावा.
नंतर तीच आभूषणं—बिछिया आणि पैंजण—लक्ष्मणांच्या हाती येतात.
त्या क्षणी लक्ष्मण अत्यंत ठामपणे म्हणतात,
“ही आमची सीता माता आहे.”
इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो—
लक्ष्मणांनी सीता मातेचा चेहरा कधीच पाहिला नव्हता, तरी त्यांनी तिला कसं ओळखलं?
याचं उत्तर आहे—संस्कार.
लक्ष्मणांसाठी भाभी म्हणजे केवळ भावाच्या पत्नी नव्हत्या, तर त्या आईसमान होत्या. म्हणूनच त्यांनी कधीही सीता मातेच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही. त्यांनी तिला फक्त तिच्या पायांवरील बिछिया आणि पैंजणांवरून ओळखले.
हा प्रसंग आपल्याला सनातन हिंदू संस्कृतीतील एक मूलभूत तत्त्व शिकवतो—
भाभी म्हणजे आईसमान.
आजच्या काळात आपण “भाभीजान” हा शब्द सहज वापरतो. मात्र “भाभीमाता” आणि “भाभीजान” यामध्ये केवळ शब्दांचा नाही, तर दृष्टिकोनाचा, वागणुकीचा आणि नात्याच्या मर्यादांचा फरक आहे.
भाभीमाता म्हटलं की आपोआप आदर, संयम आणि मर्यादा निर्माण होतात. नजर शुद्ध राहते आणि नातं पवित्र राहते.
आपल्या देवपरंपरेतही हाच संस्कार दिसतो.
देवांना जन्मानंतर त्यांच्या मातांच्या नावाने ओळखले जाते—
गंगापुत्र भीष्म, देवकीनंदन श्रीकृष्ण, कौशल्यानंदन श्रीराम.
आणि विवाहानंतर ते पत्नीच्या नावासोबत ओळखले जातात—
गौरीशंकर, लक्ष्मीनारायण, सियाराम, राधेश्याम.
हे केवळ योगायोग नाहीत, तर स्त्रीसन्मान आणि नात्यांच्या पवित्रतेचे प्रतीक आहेत.
ही गोष्ट खूप छोटी वाटू शकते,
पण ज्याला ती समजली, त्याच्यासाठी ती आयुष्य बदलणारी आहे.
“हा लेख आपल्या कुटुंबातील तरुणांपर्यंत नक्की पोहोचवा.”

डॉ. किरण बोधले 9730347449
लेखक, वक्ते व विचारमंथनकार
सदर – कथा आणि कारण
