
🏆 वारी सेवेत उल्लेखनीय कार्य! डॉ. एकनाथ बोधले यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्कार
पंढरपूर :
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या “भक्ती विठोबाची – सेवा आरोग्याची” या विशेष उपक्रमांतर्गत पंढरपूर तालुक्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथे आयोजित विशेष समारंभात राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. प्रकाश अबीटकर तसेच राज्यमंत्री मा. ना. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते डॉ. बोधले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी सिव्हिल सर्जन डॉ. डोईफोडे, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विजयकुमार सरडे, डॉ. महेश सुडके आदी उपस्थित होते.
दरवर्षी आषाढी यात्रेदरम्यान देहू–आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी “भक्ती विठोबाची – सेवा आरोग्याची” हा उपक्रम राबविला जातो. या अंतर्गत विनामूल्य आरोग्य तपासणी, औषधोपचार, आपत्कालीन सेवा तसेच आरोग्य जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येते.
“जे पाऊले चालती पंढरीची वाट, आरोग्य दूत देईल आरोग्यास साथ” या उक्तीप्रमाणे आरोग्य दूतांची नियुक्ती करून वारकऱ्यांना तत्काळ उपचार व मार्गदर्शन देण्यात आले. साथीचे आजार रोखण्यासाठी स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात आला.
या सर्व कामगिरीची दखल घेत राज्य शासनाने पंढरपूर तालुका आरोग्य विभागाला उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार जाहीर केला असून, तो स्वीकारताना डॉ. एकनाथ बोधले यांच्या नेतृत्वाचा विशेष गौरव करण्यात आला.
“




यात्रा कालावधीत पालखी मार्ग तसेच शहर व तालुक्यात भाविकांसाठी उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविल्या. राज्य शासनाकडून मिळालेला हा पुरस्कार म्हणजे आमच्या कार्याची पोहोचपावती आहे. यामुळे अधिक ऊर्जा मिळाली असून, पंढरपूर तालुक्याची मान उंचावली आहे.”
— डॉ. एकनाथ बोधले, तालुका आरोग्य अधिकारी, पंढरपूर

