श्रीमद्भागवत हा परिपूर्ण ग्रंथ आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने यासाठी ३ गोष्टी महत्त्वाच्या आहेत . अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण होय . यामध्ये *अपूर्ण* म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान नाही असा ; *पूर्ण* म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान आहे असा आणि *परिपूर्ण* म्हणजे असलेले ज्ञान जगाला देण्याचे सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे असा.भागवत ग्रंथ हा संपूर्ण विश्वाला ज्ञान देणारा ग्रंथ आहे  म्हणून, श्रीमद्भागवत कथा ही परिपूर्ण आहे, असे निरुपणकार पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले. ते आज ७व्या दिवशीच्या श्रीमद्भागवत कथा चिंतन या विषयावर निरुपण करीत होते.                               

           सुतमुनी आणि शौनक ऋषी या दोघांमध्ये संवाद सुरु आहे. सुतमुनी  सांगतात की  भागवत कथा  हे  *कथासार* आहे.   सर्व कथांचे सार म्हणजे भागवत होय तसेच सर्व कथांमध्ये श्रेष्ठ कथा म्हणजे भागवत कथा होय
         भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने निर्माण होणारा विवेक कशाने वाढेल? त्या संबंधात विवेक कशाला म्हणावे? संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात सांगितले आहे- “सारासार विचार हरिपाठ।” अर्थात सार आणि असार ज्याला कळले तो विवेक समजावा. थोडक्यात चांगलं काय आणि वाईट काय? हे ज्याला कळले तो विवेक होय. त्याचप्रमाणे, तात्विक दृष्टीने वैराग्य म्हणजे ईहलोकापासून परलोकातपर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या भूमिकेस वैराग्य असे म्हणतात. यासाठी, डॉ. जयवंत महाराज उदाहरण देतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठविलेला सोन्याचा नजराणा तुकाराम महाराज नको म्हणतात हे खरे वैराग्य होय .
                शौनक ऋषी सुतमुनींना म्हणतात- आता आम्हाला श्रीमद्भागवत कथासार सांगा आणि विवेक कशाने वाढेल ते सांगा. डॉ जयवंत महाराज स्पष्ट करतात, *मी कोण आहे? याचा विचार करणे  हा खरा विवेक होय . या विवेकानेच आत्मानुभूती येत असते .
                  पुढे या भागवत कथेत देवर्षी नारद मुनी संचार करत करत बद्रीनाथाला जातात. तेथे त्यांची सनतकुमार  यांच्याशी भेट होते.त्या ठिकाणी सनतकुमारांनी नारदांना विचारले, नारदजी , तुम्ही सर्व गोष्टीतून मुक्त असून, ही तुमच्या चेह-यावर चिंता दिसून येतेय……! असे का ? काय झाले आहे ?  तेव्हा, नारदमुनी म्हणाले, मी पृथ्वीवर जेव्हा विहार करण्यास आलो तेव्हा मी फिरत फिरत सगळीकडे पाहत होतो. सर्वत्र अधर्म दिसतोय, उपद्रवी माणसे आहेत, फसवणूक आणि छल-कपटीचा व्यवहार चालू आहे. संत म्हणून घेणारे सुध्दा पाखंडी दिसून आले. येथे कन्येचा विक्रय केला जातो. पती-पत्नीत कलह आहेत. हिंदू संस्कृतीचे महत्त्व राहिले नाही. नारद अशा प्रश्नांनी द्विदावस्थेत होते. पण एकेठिकाणी एक तरुण स्त्री आहे व वृद्ध दोन पुत्र आहेत हे पाहून नवल वाटले .ती स्त्री म्हणजे भक्ती होय व ते दोन पुत्र म्हणजे ज्ञान व वैराग्य होय . नारदांनी इथे भक्तीचे महात्म्य गायले आहे व या दोन पुत्रांना जागे करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण हे दोन जागे होत नाहीत तेव्हा नारदांना चिंता वाटू लागली की हे जागे कसे होतील तेव्हा आकाशवाणी झाली, नारदा तुम्हाला एक साधन करावे लागेल. तुम्हाला संत शिरोमणी भेटतील. ते तुम्हांला साधन सांगतील. तेव्हा, बद्रीनाथाला पोहोचल्यावर सनत् कुमारांना भेटून नारदांना संतांना भेटल्याचा आनंद झाला. तेव्हा, सनत् कुमार सांगतात, तुम्ही *अनुष्ठानपूर्वक श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करावं.* या पुढील निरुपण श्रीगुरु डॉ जयवंत महाराज बोधले उद्याच्या सत्रात करतील. ही कथा ऐकताना मंदीरात निरव शांतता होती. *श्रोत्यांना आता उद्याच्या प्रवचनाच्या सत्रात कथेत काय होते, याची उत्सुकता लागून राहिली आहे.*
    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed