
आज माणसाचं मन अस्थिर आहे. हातात मोबाईल आहे, पण मन हातातून निसटलेलं आहे. अशा काळात संतांचे विचार हेच एकमेव औषध आहेत. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या संतांनी मनावरच भाष्य केलं. मन शांत नसेल, तर सत्य समजणं कठीण आहे.
ज्ञानोबांच्या चरित्रातला प्रत्येक प्रसंग पाहिला, तर लक्षात येतं की ते पुढच्या कित्येक शतकांची भाषा बोलत होते. पण ती समजण्यासाठी मन स्थिर असणं आवश्यक आहे. आज मात्र ती स्थिरता हरवत चालली आहे. म्हणूनच आपण त्या पायांपर्यंत पोहोचताना कुठेतरी कमी पडतोय.
भोसरी, देहू, आळंदी ही भूमी भाग्यवान आहे. कारण ज्ञानोबा-तुकोबा इथे हाकेच्या अंतरावर आहेत. शरयूने राम पाहिला, यमुनेने कृष्ण पाहिला; पण या दोघांपेक्षाही भाग्यवान नदी कोणती असेल, तर ती इंद्रायणी. लहानसा प्रवास, पण त्या प्रवासात ज्ञानोबा-तुकोबा असे महान संत पाहिले.
ज्ञानोबा आणि तुकोबांमध्ये नेमका फरक काय?
हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. त्याचं उत्तर मात्र अतिशय साधं, पण खोल आहे. ज्ञानोबा हळुवारपणे कानात सांगतात – “बाबा, असं नाही, असं वाग.”
आणि तुकोबा थेट कानाखाली लावून सांगतात – “असं वागावंच लागतं!”
एवढाच काय तो फरक. विचार मात्र एकच, दिशा एकच आणि ध्येयही एकच – मन स्थिर करा.
तुकाराम महाराजांनी पिढ्यान्पिढ्या चालत आलेली कर्जाची कागदपत्रं इंद्रायणीच्या डोहात बुडवली. जगातील पहिली ‘कर्जमाफी’ जर कुणी केली असेल, तर ती जगद्गुरु तुकाराम महाराजांनीच!
संत सांगतात – पैसा कमवा, हा पुरुषार्थ आहे. पण “जोडूनिया धन उत्तम व्यवहार” हा तुकोबांचा आग्रह आहे. पैसा महत्त्वाचा आहे, पण मन अडकायला नको. मन नको त्या ठिकाणी अडकलं, तर त्याचे परिणाम काय होतात, हे आपण रोज पाहतो.
ज्ञानोबा सांगतात – मन स्थिर करा, पण कुठे?
उत्तर स्पष्ट आहे – परमेश्वराच्या चरणांशी.
पण आज मन कुठे स्थिर होईल, हेच सांगता येत नाही.
संत फक्त बोलले नाहीत, त्यांनी जगून दाखवलं.
तुकाराम महाराज म्हणतात –
“आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी,
बोलिले जे ऋषी, साच भावे वर्तावया.”
म्हणजेच – आम्ही फक्त भाषण करायला नाही, तर कृतीतून दाखवायला आलो आहोत.
ज्ञानेश्वरीवर जनतेनं जेवढं प्रेम केलं, तेवढं क्वचितच कुठल्या ग्रंथावर झालं असेल. अनेकांना अक्षरशः अर्थ कळत नाही, पण तरीही माऊलीची ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन पारायण केलं जातं. कारण त्या ग्रंथामागे संताचं जगणं आहे. जगणं वजा केलं, तर साहित्य उरत नाही.
मीराबाई, गोविंदपंत, गहिनीनाथ महाराज, जनाबाई, प्रल्हाद – ही सगळी उदाहरणं एकच सांगतात की भक्तांनी जितकं प्रेम केलं, तितकंच प्रेम भगवंतानंही केलं.
एक सुंदर कथा सांगते –
देवाने भक्तांची यादी काढली. पहिल्या यादीत ज्ञानोबा-तुकोबा नाहीत. दुसऱ्या यादीतही नाहीत. तिसऱ्या यादीत मात्र सगळ्यांची नावं आली.
का?
देव म्हणाला –
पहिली यादी माझी भक्ती करणाऱ्यांची,
दुसरी यादी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची,
आणि तिसरी यादी ज्यांची मी भक्ती करतो, ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांची!
असा रुबाब आहे आपल्या साधुसंतांचा.
भजन गायले की पांडुरंग नाचायला येतो – असं प्रेम फक्त संतांनाच मिळालं.
आजच्या धावपळीच्या, अस्थिर काळात एकच संदेश आहे –
ज्ञानोबा असोत वा तुकोबा, सांगणं एकच आहे : मन स्थिर करा.
कारण स्थिर मनातच देव उतरतो, आणि माणूस घडतो.
संग्रहित लेख : डॉ. किरण बोधले
मो. ९७३०३४७४४९
