🌺—–श्रावणमास प्रवचनमाला—–🌺

दिनांक        : २५ जुलै ; शुक्रवार
निरुपणकार : डॉ.श्रीगुरु जयवंत महाराज
बोधले
विषय         : श्रीमद्भागवत कथा चिंतन
सत्र            :   १
स्थळ         : श्री भगवंत मंदिर, बार्शी.

*श्रीमद्भागवत पुराण हे ‘महापुराण’ आहे.* पद्मपुराणामध्ये वेद जाणणारा हा श्रेष्ठ असला तरी ज्याला पुराण कळाले तो सर्वश्रेष्ठ, असे म्हटले आहे. असे निरुपणकार पूजनीय *श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले* यांनी आज सांगितले.
आज बार्शीच्या भगवंत मंदीरात ह.भ.प. डॉ. जयवंत महाराजांच्या अमृतवाणीतून *”श्रीमद्भागवत कथा चिंतन”* या विषयावर निरुपणास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी *”श्रीमद्भागवत पुराण”* या ग्रंथाचे पूजन भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच श्री बुडुखदादा आणि सौ. शैलजाताई बुडुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रंथ पूजा व मंत्रस्तवन श्री भगवंत मंदिरातील पुजारी श्री बडवे मंडळीकडून करण्यात आले. प्रस्ताविकात प्रा.श्री विलास जगदाळे सर यांनी आत्तापर्यंत झालेल्या प्रवचनाचा आढावा मांडून ही प्रवचनमाला २१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे, असे सांगितले. श्रीगुरु जयवंत महाराज म्हणतात *पुराण* या शब्दाचा शास्त्राने केलेला अर्थ पूर्वीच्या परंपरा ज्यामध्ये सांगितल्या आहेत, त्यास पुराण असे म्हणतात. या पुराणाचा दुसरा अर्थ सांगताना महाराज म्हणतात, जे पुरातन आहे आणि सद्य कालात सुध्दा ते नवीनतम उद्यतम वाटते, ते पुराणच होय. उदाहरणार्थ, भगवान श्रीकृष्ण चरित्र आणि भगवान श्रीराम चरित्र, ही चरित्रे पुरातन असूनही आज ही आपणाला उत्कट भावनेने ऐकावसे वाटतात. ज्या पुराणातल्या गोष्टी आहेत त्या आजही आपण आचरणात आणतो आहेत. पुढे  पुराण या शब्दाचा लौकिक आणि अलौकिक स्वरुपात अर्थ सांगताना महाराजांनी शास्त्रांनी सांगितलेली ५ लक्षणे आणि त्याचे अर्थ विस्तृत स्वरुपात सांगितली आहेत. १) *सर्ग*- यामध्ये विश्वाची उत्पत्ती सांगितलेली आहे २) *प्रतिसर्ग*-यामध्ये विश्वाचा प्रलय सांगितलेला आहे ३) *वंश* – यामध्ये वंशाचा विस्तारपूर्वक विचार करण्यात आलेला आहे. ४) *मनवंतर* – यामध्ये कलानुरुप स्थित्यंतरे होत राहतात याचा विचार करण्यात आलेला आहे ते एक पुराणच आहे. ५) *वंशानुचरितम* – यामध्ये त्या त्या काळात जन्माला अथवा अवताराला आलेल्या महान विभुतींच्या चरित्र कथा सांगितल्या जातात, त्याला पुराण असे म्हणतात. पुढे महाराज सांगतात वेदामध्ये परमात्म्याच्या केवळ निर्गुण रुपाचे वर्णन केलेले असते. परंतु, पुराणामध्ये निर्गुणाबरोबरच सगुण रुपाचेही वर्णन केलेले असते. पुराणामध्ये ऐकणारा हा दोन्ही तत्वाचे अनुसरण करीत असतो. ज्याला कळते तो ज्ञानी असतो. परमात्मा हा ज्ञानस्वरुप आहे, असे वेद सांगतात. असे ह. भ.प.श्रीगुरु जयवंत महाराजांनी सांगितले. तसेच, महाराजांनी १८ पुराणांची नावेही सांगितली. महर्षी व्यासांनी सांगितलेल्या १८ पुराणामध्ये *भागवत पुराण हे महापुराण आहे* असे शेवटी सांगितले.

🙏🙏🙏
बोधवाणी परिवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed