श्रीमद्भागवत कथा ही केवळ नामसंकीर्तन नव्हे, तर त्यामध्ये चिंतन, मनन आणि तत्त्वज्ञानही दडलेले आहे. ही कथा श्रवण करताना, काही तात्त्विक तत्त्वांचे आचरण करणे अनिवार्य असते, असे मौलिक मार्गदर्शन पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी श्रावणमास प्रवचनमालेच्या बाराव्या सत्रात केले. श्री भगवंत मंदिरामध्ये ‘श्रीमद्भागवत कथा चिंतन’ या विषयावर त्यांनी भावपूर्ण निरूपण केले.
              या प्रवचनमालेत त्यांनी आतापर्यंत सहा अध्यायांतून श्रीमद्भागवत कथेचे महात्म्य अत्यंत रसाळ पद्धतीने आणि भावपूर्णतेने श्रोत्यांपर्यंत पोहोचवले आहे. एकादशीच्या पावन पर्वावर त्यांनी श्रीमद्भागवत कथेच्या नव्या टप्प्याचा प्रारंभ मंगलाचरणाने केला.
              भागवत कथेतील एकूण १८,००० श्लोकांपैकी प्रारंभीचा श्लोक सर्वात महत्त्वाचा मानला जातो. या एका श्लोकात संपूर्ण कथेचे सार सामावलेले असून, तो संपूर्ण भागवत तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करतो, असे स्पष्ट करत डॉ. महाराज सांगतात की, ‘मंगलाचरणातच अखंड भगवदतत्त्व सामावलेले असते.’
             ‘मंगल’ म्हणजे असे वर्णन, ज्यामुळे इष्ट फलाची प्राप्ती होते. कार्य विघ्नरहित आणि पूर्णत्वास पोहोचण्यासाठी जे कर्तव्य पार पाडले जाते, त्याला मंगल असे म्हणतात. या मंगलाचे तीन प्रकार असून, ते म्हणजे आशीर्वादरूप मंगल, नमस्काररूप मंगल आणि वस्तुनिर्देशरूप मंगल. शिष्याच्या कल्याणासाठी भगवंताला करण्यात येणारी प्रार्थना म्हणजे आशीर्वादरूप मंगल. नम्रतेने स्वतःला लीन करून इतरांमध्ये परमोत्कर्ष मानणे, ही भावना नमस्काररूप मंगलात दिसते. आणि भगवंताचे यथार्थ स्वरूप वर्णन करणारे मंगल म्हणजे वस्तुनिर्देशरूप मंगल, जे अलौकिक मानले गेले आहे. महर्षी व्यास याच विचारांची पावती देताना म्हणतात – “सत्यम् परम धीमहि”, म्हणजेच अखंड मंगल असे भगवद् स्वरूपच होय.
              या मंगल भावनेतून उद्भवणाऱ्या विविध कृतींवर चिंतन करताना डॉ. महाराजांनी जीवनातील विविध घटनांचे चार प्रकारांमध्ये विवेचन केले आहे – ज्या काही वेळा मंगल म्हणून आरंभ होतात पण शेवटी अमंगल ठरतात, काही घटनांचा आरंभ अमंगल वाटतो पण परिणामी मंगल होतो, काहींचा आरंभ व शेवटही अमंगलच असतो आणि काही घटनांचा आरंभही मंगल असतो आणि परिणामही.
                उदाहरणार्थ, कौरवांच्या आयुष्यातील वैभवाचा आरंभ पाहिला असता त्यांना राज्य, सत्ता, संपत्ती प्राप्त झाली होती, पण धर्मबुद्धी अभावामुळे त्यांचा अहंकार, द्वेष आणि अधर्माचा मार्ग त्यांना विनाशाकडे घेऊन गेला. येथे आरंभ मंगल वाटला, पण परिणाम मात्र अमंगल ठरला.
                त्याच्या उलट, भक्त प्रह्लादाच्या जीवनाकडे पाहिले असता, त्याला वडिलांनी त्रास दिला, अनेक संकटांत टाकले, त्यामुळे त्याचे जीवन आरंभी अमंगल वाटले. पण भक्तीची ताकद एवढी प्रभावी होती की अखेर प्रभू नारायण प्रकट झाले आणि प्रह्लादाला विजय प्राप्त झाला.
                 रावणाने सीतेचे अपहरण केले, हा कृतीचा आरंभच अधर्माचा असल्याने अमंगल होता आणि त्याचा परिणामही विनाश आणि पतन यातच झाला. हे स्पष्ट उदाहरण आहे की अधार्मिक कर्माचे फल कधीही मंगल होऊ शकत नाही.
                 याच्या अगदी विरुद्ध, श्रीरामांनी वनवासाचा निर्णय धर्मपालन म्हणून शांतपणे स्वीकारला. हा आरंभ जरी त्यागमय होता, तरी तो मंगल भावनेतून प्रेरित होता. या निर्णयातूनच राक्षसांचा संहार झाला, सीतेची मुक्ती झाली आणि अयोध्येचा सिंहासनारूढ रामराज्याचा सुवर्ण काळ पुन्हा उजाडला. येथे आरंभही मंगल आणि परिणामही मंगल.
              या उदाहरणांमधून एक गोष्ट स्पष्ट होते – जो निर्णय धर्मबुद्धीने, नम्रतेने आणि निःस्वार्थपणे घेतला जातो, तो नक्कीच शुभ फलदायी ठरतो. श्रीमद्भागवत कथा म्हणजे केवळ एक ऐकण्यासारखी गोष्ट नाही, तर ती जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शन आहे. तिच्या श्रवणातून केवळ भक्तीच नव्हे, तर विवेक, धर्म, आणि मंगल कर्माचे तत्त्वज्ञानही अंत:करणात प्रकट होते. असे मार्गदर्शन डॉ. जयवंत महाराज या सत्रात शेवटी करतात.

#डॉ जयवंत_महाराज_बोधले, #भागवत_कथा #श्रीमद्_भागवत #श्रीमद्भागवत #मंगल #प्रवचन



        
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed