*धामणगाव दु. (ता. बार्शी) :*
सोलापूर जिल्ह्यातील वारकरी परंपरेचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या श्री क्षेत्र धामणगाव येथे संतश्रेष्ठ श्री माणकोजी महाराज बोधले यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक १४ जून २०२५, शनिवार रोजी पुष्पवृष्टी कीर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे.
या सोहळ्यात सद्गुरु श्री प्रभाकरदादा बोधले महाराज (धामणगावकर – पंढरपूर) यांचे प्रभावी कीर्तन होणार असून, हे कीर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत होईल. कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याची वेळ दुपारी १२ ते ३ अशी आहे.
श्री माणकोजी महाराज हे १६०४ साली धामणगाव येथे जन्मलेले थोर संत असून, त्यांनी आपल्या भक्ती, वैराग्य, कीर्तनसंपदा आणि समाजसेवेमुळे धामणगावला ‘धाकटी पंढरी’ ही ओळख मिळवून दिली. त्यांच्या कीर्तनसेवेमध्ये भगवंत पांडुरंग स्वतः टाळ घेऊन उपस्थित राहत असल्याच्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्यांनी जीवनाच्या अखेरच्या टप्प्यावर धर्मलिंगेश्वराजवळ संजीवन समाधी घेतली. याच पुण्यठिकाणी दरवर्षी समाधी उत्सव साजरा होतो.
यावर्षीच्या उत्सवात भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, संतांच्या पुण्यचरित्राचा लाभ घ्यावा आणि पांडुरंगभक्तीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन समस्त बोधराज भक्त मंडळ यांनी केले आहे.
