श्रीमद्भागवत हा चित्तशुद्धीचा अमोघ उपाय आहे. या ग्रंथात भगवंताच्या विविध अवतारांचे विस्तृत विवेचन असून, भगवंत भक्तांचे रक्षण कसे करतात, हे समजावून सांगण्यात आले आहे. याच संदर्भात पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी प्रवचनसत्राच्या सतराव्या दिवशी अर्जुन आणि अश्वत्थाम्याच्या युद्धप्रसंगाचा दाखला देत, अर्जुनाच्या भगवंतावरील अखंड भक्तीचे अत्यंत भावपूर्ण निरूपण केले.

महाराज सांगतात, श्रीमद्भागवत समजून घेण्यासाठी सर्वप्रथम परीक्षित राजाचे चरित्र समजणे आवश्यक आहे. मात्र, परीक्षित कोण होता हे समजण्यासाठी पांडवांचे चरित्र जाणून घेणे गरजेचे आहे. कारण पांडवांच्या जीवनातूनच भगवान श्रीकृष्णाचे चरित्र उलगडते, आणि कृष्णचरित्र समजणे म्हणजेच श्रीमद्भागवताचा सार उलगडणे होय.

प्रवचनात त्यांनी ‘दया’ या अनमोल गुणाचे महत्त्व सांगताना द्रौपदीचे उदाहरण दिले. अश्वत्थाम्याने तिचे पाच पुत्र निर्दयपणे मारले. अपार दुःखातही, जेव्हा अर्जुनाने अश्वत्थाम्याला पकडून आणले, तेव्हा द्रौपदीने म्हणाली –
**“तो आपले गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आहे. त्याला गुरुपुत्र म्हणून सोड. मी जसे दुःख भोगत आहे, तसे त्याच्या आई गौतमीवर ओढवू नकोस. तिचा शेवटचा आधार हाच आहे.”**
या शब्दांतून तिच्या अंतःकरणातील धर्मनिष्ठा, करुणा, समदृष्टी आणि कपटरहित स्वभाव प्रकट झाला.

या संदर्भात महाराजांनी “आई” या शब्दाचा अर्थ अतिशय मार्मिकरीत्या उलगडला. “आई” ही फक्त दोन अक्षरे नसून, तो प्रेमाचा अथांग सागर आहे, असे सांगत त्यांनी समाजातील आईच्या स्थानाचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यानंतर त्यांनी कुंती मातेकडील एक विलक्षण प्रसंग कथन केला. युद्धानंतर ती भगवान श्रीकृष्णाकडे संकटाचे दान मागते, कारण संकटकाळात भगवंताचे स्मरण अधिक होते. संकटे आपल्याला सातत्याने भगवंताशी जोडून ठेवतात. म्हणूनच महाराज म्हणतात –
**“संकटे येणे हीच मानवी जीवनाची खरी शोभा आहे.”**

प्रवचनाच्या शेवटी, महाराजांनी भीष्माचार्य आणि श्रीकृष्ण यांच्या संवादातून ‘कर्माचा सिद्धांत’ भाविकांच्या मनावर ठसवला. धर्मराज व भीष्माचार्य यांच्यातील संवादातून ‘विष्णुसहस्रनाम’ जपाचे महत्त्व सांगताना, भगवन्नामस्मरणाची अमूल्यता त्यांनी पटवून दिली.

आणि आता, पुढील सत्रात **उत्तरेच्या गर्भातील बालकाचे भगवंत श्रीकृष्णाकडून झालेले अद्भुत रक्षण**, हे अद्वितीय चरित्र ऐकण्याची आनंदवार्ता देत त्यांनी सत्राचा समारोप केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version