पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास देशभरातून तीव्र विरोध होत असतानाच भारतीय संघाने आशिया चषकातील लढतीत पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. मात्र सामन्यानंतरच्या घडामोडींनी वाद निर्माण केला आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेक झाल्यावर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानी कर्णधारासोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी संघासोबत पारंपरिक हस्तांदोलन टाळलं. यामुळे पाकिस्तानच्या संघव्यवस्थापनाने नाराजी व्यक्त करत सामनाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
पाकिस्तानी प्रशिक्षक माईक हेसन यांनी सांगितले की, “आमचा संघ हस्तांदोलनासाठी थांबला होता. मात्र भारतीय संघाने ते टाळल्याचं नंतर लक्षात आलं. त्यामुळे पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा सामन्यानंतरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही.”
दरम्यान, क्रिकेटच्या नियमावलीनुसार सामन्यानंतर हस्तांदोलन करणं बंधनकारक नाही. हे फक्त खेळाडूवृत्तीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे भारतीय संघावर थेट दंडात्मक कारवाईची शक्यता कमी आहे. मात्र जाणूनबुजून खेळभावना न दाखवणे ही बाब आंतरराष्ट्रीय स्तरावर नकारात्मक ठरू शकते.
➡️ आता आयसीसी आणि सामनाधिकारी या प्रकरणावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
