मुंबई | प्रतिनिधी (दिनप्रभा):
महाराष्ट्राच्या राजकारणात आज नवे समीकरण जुळले. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृतपणे युती जाहीर करत मराठी अस्मितेसाठी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
युतीच्या पहिल्याच भाषणात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत स्पष्ट इशारा दिला. “एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. मुंबई किंवा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा राजकीय खात्मा करू,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसाच्या बलिदानातून मिळालेली आहे आणि त्या संघर्षाचा अपमान होऊ देणार नाही. “भांडलो तर हरू, एकत्र राहिलो तर जिंकू,” असे आवाहन करत त्यांनी मराठी जनतेला तुटू-फुटू नये, असा संदेश दिला.
मराठी जनतेला थेट आवाहन करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आता जर का चुकाल तर संपाल, फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका.”
“मराठी माणूस कोणाच्या नादी लागत नाही आणि कोणी त्याच्या वाटेला आला, तर त्याला परत जाऊ देत नाही,” असे सांगत त्यांनी आपल्या भाषणातून सरकारला स्पष्ट इशारा दिला.
मनसे-शिवसेना युतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
