सुस्ते (ता. पंढरपूर): मौजे सुस्ते येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दुसऱ्या दिवशी अध्यात्म, ज्ञान आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
व्याख्यानपुष्प – ऍड. श्री गजानन भाकरे
या दिवशीच्या व्याख्यानमालेत दुसरे पुष्पगुंठाण म्हणून अॅड. गजानन भाकरे यांनी “तिमिरातून तेजाकडे – एक आनंददायी प्रवास” या विषयावर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात तिमिर म्हणजे अज्ञान आणि तेज म्हणजे ज्ञान असे स्पष्ट करत, अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल करणे हाच खऱ्या अर्थाने आनंददायी जीवनाचा मार्ग असल्याचे सांगितले.
तसेच त्यांनी केवळ बाह्य ज्ञान नव्हे तर आत्मिक ज्ञान (आत्मज्ञान) मिळवणे आवश्यक असून “मी कोण आहे?” या प्रश्नाचा शोध घेणे हेच खरे जीवनाचे ध्येय असल्याचे अधोरेखित केले. छोट्या-छोट्या उदाहरणांद्वारे आणि दृष्टांतांमधून त्यांनी विषय अधिक समजावून सांगत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
किर्तन सेवा – श्रीहभप रामेश्वर महाराज जाधव
यानंतर दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा खरी भक्ती परायण ह.भ.प. रामेश्वर महाराज जाधव यांनी सादर केली. त्यांनी “पवित्र तो देह वाणी, पुण्यवंत जोगदे अच्युत सर्वकाळ” या अभंगावर आधारित कीर्तन करत, संतांच्या माध्यमातूनच देवाची ओळख होते हा अत्यंत मोलाचा संदेश दिला.
त्यांनी सांगितले की, संतांशिवाय देव कळत नाही आणि भेटतही नाही, त्यामुळे संतांचे स्वरूप, त्यांची पवित्रता आणि त्यांच्या जीवनातील भगवंत चिंतन समजून घेणे आवश्यक आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने उपस्थित भाविकांना भक्तीमार्गाची प्रेरणा दिली.
अन्नदान सेवा
यावेळी दुसऱ्या दिवशीचा अल्पोपहार श्री अभिमान वसंत चव्हाण, दुपारचे अन्नदान श्री सूर्यकांत आप्पासाहेब भोसले, तसेच रात्रीचे अन्नदान चव्हाण परिवार (वाडा) यांच्या वतीने करण्यात आले.
एकूणच, हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी ज्ञान, भक्ती आणि सेवाभावाचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाल्याने वातावरण पूर्णपणे भक्तीमय झाले होते.
