*-डाॅ.जयवंत प्रभाकरदादा महाराज बोधले (धामणगावकर-पंढरपूर)*
९८२२३८११५६
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून सर्वदूर ओळख आहे. या भूमीमध्ये वेगवेगळ्या भागात तेथील संतांनी आचार-विचार आणि भक्तिमार्गातून समाज उन्नत केला. अशाच तेजस्वी संतपरंपरेत धामणगावचे संत माणकोजी महाराज बोधले यांनी सोलापूर जिल्हा त्याचबरोबर कर्नाटक, आंध्र अशा विविध ठिकाणी विठ्ठलभक्ती रुजवली.
इ.स. १६०४ मध्ये क्षत्रिय कुळात जन्मलेल्या माणकोजी महाराजांच्या चरित्रात लहानपणापासूनच विलक्षण सामर्थ्य, वीरता आणि माधुर्य यांचा संगम दिसून येतो. त्यांच्या अंगी असलेली शंकराची शक्ती आणि पांडुरंगभक्ती यांचे विलक्षण मिश्रण त्यांच्या जीवनकार्यांतून प्रकट झाले. पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी गेलेल्या महाराजांनी अखंड १४ दिवस भजन करून साक्षात भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि त्या भेटीत मिळालेल्या एकांत बोधामुळे त्यांचे नाव ‘बोधले’ झाले.
अत्यंत संपन्न घराण्यात, भानजी जगताप आणि पार्वती यांच्या पोटी माणकोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या मातापित्यांना वारकरी संप्रदायाची प्रगाढ ओढ होती. या दाम्पत्यास दोन पुत्र – शिवाजी महाराज आणि माणकोजी महाराज – अशी देणगी लाभली. संत माणकोजी महाराजांचा जन्म ही केवळ एक घटना नव्हती, तो जणू साक्षात शंकराचा अवतारच होता-
*कैलासवासी शंकर।*
*धरती उदरी अवतार।*
*भोवती तिष्ठति सरोवर।*
*वेद गजर ऋषींचे।।*
लहानपणापासूनच त्यांच्या अंगी अफाट शक्ती व प्रभावी व्यक्तिमत्व दिसत होते.
*अष्टवर्षीय कुमार बाळ।*
*परि सर्व खेळे खेळ।*
*अंगी शक्ती प्रबळ।*
*बोले रसाळ मोहक जे।*
एकदा पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी गेलेल्या माणकोजी महाराजांना मोठ्या भावाने ; शिवाजी महाराजांनी — सांगितले, “दादा, तुम्ही धामणगावचे पाटील; पांडुरंग पंढरपूरचा पाटील आहे.” त्यानंतर माणकोजी महाराजांनी सलग १४ दिवस अखंड भजन केलं आणि त्या भक्तीच्या आर्ततेमुळे साक्षात भगवान पांडुरंग प्रकट झाले. त्यांनी एकांतात माणकोजी महाराजांना ‘बोध’ दिला आणि त्यांनंतर त्यांचे नाव ‘बोधले’ झाले.
*बोधला म्हणे देवा,तू मज बोधिले।*
*आवडीने ठेविले,नाम माझे।।*
त्यांच्या धर्मपत्नी ममताई आणि तीन पुत्र – लखमोजी, यमाजी, विठोजी यांच्या सहवासात महाराजांनी भक्तीमय जीवन जगले. त्यांच्यातील दानशूरपणाही विलक्षण होता. आपल्या शेतातील धान्य त्यांनी गोरगरिबांसाठी आणि वारीतील वारकऱ्यांसाठी वाटून टाकले.
*एक सद्भाव धरुनि अंतरीं,*
*धामणगावाची केली पंढरी।*
*चरित्र दाखवूनि नानापरी,*
*जडमूढ उध्दरी निजप्रेमें।*
त्यांच्या भक्तीने धामणगावचं रूपांतर धाकटी पंढरीत झालं. आषाढ वारीसाठी पांडुरंग स्वतः धामणगावला येतो आणि माणकोजी महाराजांना वैशाख वारीसाठी पंढरपूरला बोलावतो. या परंपरेला ‘देवलुटी वारी’ असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनसेवेची गूढता इतकी विलक्षण होती की त्यात स्वतः पांडुरंगही टाळ घेऊन उभा राहत असे. म्हणून आजही त्यांच्या परंपरेतील कीर्तनकार मागे वाकून नमस्कार करून कीर्तन सुरू करतात.
महाराजांच्या अनेक शिष्यपरंपरा महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रपर्यंत पसरलेल्या आहेत – गोपालबोध माळगावकर, मल्हारबाबा खर्डेकर, भजलींग महाराज, विश्वनाथ महाराज पेठ ही त्यांचीच तेजस्वी फळे. महाराजांनी हंसी नावाच्या दासीचा उद्धार केला, हे त्यांच्या करुणेचे आणि कृपेचे द्योतक आहे.
महाराजांच्या कीर्तनात मुद्दामहून ठेवले गेलेले प्रेत त्यांच्या कीर्तनाने जागं होऊन “विठ्ठल-विठ्ठल” म्हणू लागले. ही केवळ चमत्कार कथा नव्हे, तर भक्तीच्या सामर्थ्याचं जिवंत उदाहरण होतं.
*साक्षात श्री शंकराचा अवतार,*
*तो हा माणकोजी भक्त साचार।*
*चरित्र दावोनी भूतलावर,*
*जगत्द्धौर पै केला।*
नवनाथांचा साक्षात्कार माणकोजी महाराजांना झाला होता. त्यांनी दिलेला ‘जोग’ मंत्र आणि ९ वस्त्रांची परंपरा आजही धामणगावात श्रद्धेने चालते. त्यांची सून ‘भागीरथी आईसाहेब’ यांनाही पांडुरंगाने साक्षात्कार दिला होता.
शेवटी, माणकोजी महाराजांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला. धर्मराजांनी स्थापन केलेल्या धर्मलिंगेश्वर मंदिराजवळ त्यांनी योगमुद्रेत समाधी घेतली.
*शके सोळाशे सोळोत्तर,*
*जेष्ठ वद्य तृतीया थोर।*
*समाधिस्त माणकोजी वीर,*
*समाधी निर्धार घेतली।*
ही तारीख म्हणजे ३१ मे १६९४, गुरुवार. तीनही पुत्रांनी पूजा केली आणि रामकृष्णहरीच्या गजरात भक्तांनी अंतःकरणभरून निरोप दिला. संत माणकोजी महाराजांचे जीवन म्हणजे भक्ती, सेवा, ज्ञान, आणि समर्पण यांचा सुरेख संगम. त्यांच्या कार्यातून हिंदू-मुस्लिम ऐक्य, भक्तिपंथाचा उत्कर्ष आणि समाजासाठी समर्पित संतजीवन दिसून येते.
🙏 *संत माणकोजी महाराज संजीवन समाधी पर्वणी*🙏
🗓 *दिनांक:* १४ जून २०२५, शनिवार
🕙 *वेळ:* सकाळी १० ते १२
🎙 *कीर्तनसेवा:* श्रद्धेय सद्गुरु प्रभाकरदादा महाराज बोधले यांचे पुष्पवृष्टीचे कीर्तन
🍛 *कीर्तनसेवेनंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद आहे.*
