*धामणगाव दु. (ता. बार्शी, जि. सोलापूर) :*

           श्रीक्षेत्र धामणगाव येथे श्री संत माणकोजी महाराज बोधले यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक १४ जून २०२५ रोजी आयोजित पुष्पवृष्टिच्या कीर्तनसेवा कार्यक्रमाचा भव्य सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा अध्यात्माने भारलेला ठरला.
       या कीर्तनसेवेचे मुख्य आकर्षण होते सद्गुरु श्री प्रभाकरदादा बोधले महाराज यांचे भावस्पर्शी अभंगकीर्तन. त्यांनी संत तुकाराम महाराजांचा अत्यंत मार्मिक असा अभंग –

“धन्य ते संसारी । दयावंत ते अंतरी ।।
तेथे उपकारासाठी । आले घर ज्या ।
लटिके वचन । नाही देही उदासीन ।।
मधुरा वाणी ओठी । तुका म्हणे वाव पोटी ।।”

यावर आधारित सखोल निरूपण सादर केले. या अभंगाचा अर्थ उलगडताना सद्गुरु प्रभाकरदादा महाराज बोधले म्हणाले की, खरे संत हे घरसंसारात असूनही परमार्थाशी जोडलेले असतात.  जे संसार करत असूनही अंतःकरणात दया, करूणा आणि सहिष्णुता बाळगतात, ते खरे संत होय. त्यांचे आयुष्य कोणावर उपकार केल्याचा अभिमान न बाळगता, लोकांसाठी समर्पित असते. “तेथे उपकारासाठी आले घर ज्या” – हे संत समाजाच्या कल्याणासाठी जन्म घेतात, त्यांची प्रत्येक कृती ही लोकहिताची असते.त्यांची वाणी बनावट नसून खरेपणाने समृद्ध असते. ते कधीही राग, द्वेष वा अविचार व्यक्त करत नाहीत. त्यांच्या देहबोलीतही नम्रता असते. त्यांचे बोलणे श्रोत्यांच्या हृदयात आदर निर्माण करणारे असते. संत हे स्वार्थत्याग करून समाजासाठी वावरतात. त्यांच्या पोटी अहंकार, हेवा, द्वेष नसतो. संत माणकोजी महाराजांचे संपूर्ण जीवन या प्रत्येक ओळीतील तत्त्वांचे साक्षात उदाहरण होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
             या सोहळ्यात संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. श्री पुरुषोत्तम महाराज मोरे व ह.भ.प. श्री माणिक महाराज मोरे यांच्यासह, श्री सतीश महाराज कंधारकर (पंढरपूर), सोपानकाका महाराज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जालिंदर नालकुल साहेब, श्री शिवाजीराव काळुगे (धनश्री परिवार) यांची प्रमुख उपस्थिती होती.
            बोधले महाराज फड परंपरेतील गावे व शिष्यपरिवार तसेच बोधले घराण्यातील ह.भ.प. विवेकानंद उर्फ मनुदादा (वंशपिठाधिश), श्रीराज विवेकानंद बोधले, ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प. डॉ. एकनाथ महाराज बोधले, श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले व ह.भ.प. मनोज महाराज बोधले , डॉ किरण महाराज बोधले यांचीही उपस्थिती लाभली.
              जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून या सोहळ्यादिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेकडो भाविकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
           कार्यक्रमाची सांगता दुपारी १२ ते ३ दरम्यान महाप्रसादाने झाली. भक्तांच्या सेवेसाठी उत्तम नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण सोहळा भक्तीभाव, शिस्त व अध्यात्मिक उंचीचा अनुभव देणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version