श्रीमद्भागवतातील प्रथमच श्लोक हा एक दिव्य मंगलाचरण आहे. या श्लोकात भगवान वेदव्यासांनी ज्या स्वरूपाचे ध्यान करावे, असे सूचित केले आहे, त्याचा आशय असा — “जे परमसत्यस्वरूप तत्त्व आहे, त्याचे आम्ही ध्यान करतो.” परंतु, येथे एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वपूर्ण प्रश्न उभा राहतो — हे परम सत्य कोण आहे?
                 या प्रश्नाचे उत्तर श्लोकाच्या प्रारंभी आलेल्या सूत्रात दडलेले आहे — “जन्माद्यस्य यतः” — ज्याचा अर्थ असा की, “ज्याच्यापासून या संपूर्ण चराचर जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय घडते, ते जे मूलकारण आहे, तेच खरे परमसत्य तत्त्व होय.”
                 असे हे तात्त्विक विवेचन पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी श्रीमद्भागवत कथा चिंतनमालेच्या १४ व्या सत्रात प्रगट केले.
               “धिमहि” म्हणजेच “ध्यान करतो”, या शब्दात केवळ एक वैयक्तिक भावना नाही, तर वक्त्यासह श्रोत्यांनीही त्या परम सत्याचे स्मरण, चिंतन व नमस्कार करावा, असा संकेत आहे. तेच परम, तेच सत्य, आणि तेच परमात्मस्वरूप, हेच या श्लोकाच्या माध्यमातून प्रकट होते. या ठिकाणी वस्तूनिर्देशक मंगलाचरण आहे. मंगलाची दिशा अमूर्त नसून, ती थेट एका विशिष्ट वस्तूकडे — परमात्म्याच्या स्वरूपाकडे निर्देश करते.
                   या परम सत्याच्या संज्ञेच्या अनुषंगाने “लक्षण” या संकल्पनेचा विचार केला जातो. कारण कोणतीही वस्तू प्राप्त करण्याआधी, तिची ओळख करून घेणे आवश्यक असते आणि ही ओळख लक्षणाने घडते. उदाहरणार्थ, “ती मुलगी स्वभावाने चांगली आहे” — येथे स्वभाव हा शब्द तिच्या गुणाचे लक्षण ठरतो.
                      या संदर्भात डॉ. जयवंत महाराज पुढे स्पष्ट करतात की, लक्षणे दोन प्रकारची असतात — तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण.
तटस्थ लक्षण म्हणजे जे लक्षित वस्तूच्या ठिकाणी काही वेळ अस्तित्वात असते आणि काही वेळ नाही. उदा. एखाद्याच्या घराचा पत्ता सांगताना, “ज्या घरावर पक्षी बसला आहे, ते घर त्यांचे आहे,” असे म्हटले, तर तो पक्षी तिथे तात्पुरता आहे — त्यामुळे हे लक्षण तटस्थ स्वरूपाचे आहे.
                       तर स्वरूप लक्षण म्हणजे जे नेहमीच त्या वस्तूशी निगडित असते. उदा. “गावातील पूर्वेकडील जे घर आहे, तेच त्यांचे आहे,” असे सांगितल्यास, दिशा ही कायम असते, त्यामुळे हे स्वरूप लक्षण ठरते.अशा प्रकारे लक्षणाचे तात्त्विक विश्लेषण महाराजांनी अत्यंत सुबोध भाषेत, उदाहरणांसह सप्रमाण उलगडले.


                     यानंतर घट-पट, सुवर्ण व अलंकार यांसारख्या उपमांमधून त्यांनी कार्य-कारण सिद्धांताचे विश्लेषण केले. तसेच चर्मदृष्टी (इंद्रियनिष्ठ), तत्त्वदृष्टी (सत्त्वनिष्ठ), आणि समदृष्टी (ब्रह्मदृष्टी) या त्रिसूत्री माध्यमातून जगताचे मूळ कारण — जे एक अखंड, अजन्मा, सर्वव्यापक तत्त्व आहे — त्याचे सखोल विवेचन आजच्या प्रवचनात पूजनीय डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी भावपूर्ण पद्धतीने उकल केले.
         

              
    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version