वेड्या बहिणीची वेडी ही माया…
चंदनाचा टिळा, हाती रेशमी धागा
श्रावणाची सर, आनंदाची बहर
भावा-बहिनीच्या आनंदाचा हा सण.
भारतीय पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. या दिवसाला ‘रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्याचा कार्यक्रम असतो. ‘राखी’ ह्या शब्दातच ‘रक्षण कर’ हा संकेत आहे.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात. राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.
या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे.
🚩 त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव”🚩
त्या छोट्याश्या गावातला तो छोटासाच एस.टी.स्टँड आता जवळजवळ निर्मनुष्य झाला होता. रात्रीच्या अकरा वाजता तिथे वर्दळ ती काय असणार होती. तिच्या प्रवासाचा तो शेवटचा स्टॉप. तिच्या भावाकडेच आली होती ती, रक्षाबंधनाच्या निमित्तानं. तिचा भाऊ यायचा होता तिला घ्यायला स्टँडवर. बाजूच्याच मोडक्या बाकड्यावर बसली ती, भावाच्या वाटेकडे डोळे लावून. "येईलच इतक्यात" म्हणता म्हणता घडाळ्याचे काटे पुढे सरकू लागले आणि तिचा धीर हळूहळू सुटू लागला. "घरनं कुणी येणार आहे का ताई?" ड्रायव्हरनं विचारलं त्याला ती चाचरत "हो" म्हणाली. त्या दोघांचं - ड्रायव्हर-कंडक्टरचं तिथं असणं आपल्यासाठी सोबतीचं आहे की…. तिच्या मनांत आलं. पेंगुळलेल्या तिच्या छोट्या मुलाला जवळ घेऊन ती भेदरलेल्या अवस्थेत बसून राहिली. ते दोघंही तसेच बसून होते एस.टी. त, दिवे बंद न करता. त्यांचं तिथं असणं आता हळूहळू तिला दिलासादायक वाटू लागलं होतं. अस्वस्थपणे भावाची वाट बघत असतांनाच दूरवर एक प्रकाशाचा ठिपका दिसला तिला आणि पाठोपाठ बाईकचा आवाजही कानी आला तिच्या. हायसं वाटून ती उभी राहिली आणि भाऊ आलाच तिचा.
“अगं, वाटेत ही बंदच पडली म्हणून लेट झाला बघ” भावाचं बोलणं ऐकत ती बाईकवर भावाच्या मागं बसली आणि पुन्हा खाली उतरली. एस.टी. तले दिवे ते बंद करत असतांनाच ती पुन्हा एस.टी. त चढली. हातातल्या दोन राख्या तिनं त्यांच्या समोर धरल्या. क्षणभर गोंधळले ते पण मग हसले आणि मग हसत हात पुढे करत उभे राहिले ते तिच्यासमोर. रक्षाबंधनाचा सण त्या तिघांसाठी पवित्र झाला होता.
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
