प्रतिनिधी | दिनप्रभा

रामायणातील सर्वात वादग्रस्त आणि गूढ व्यक्तिमत्त्व म्हणजे लंकेचा राजा रावण. सामान्यतः त्याची ओळख सीतेचे अपहरण करणारा खलनायक अशीच केली जाते. मात्र रावण केवळ खलनायक होता का? की तो वेदांचा अभ्यास असलेला, शिवभक्त आणि महान विद्वान होता? या प्रश्नावर आज विचार करण्याची गरज आहे.

राजा रावण हा विश्रवा ऋषींचा पुत्र होता. विश्रवा ऋषी हे महान वेदज्ञ होते आणि त्याच संस्कारांत रावण घडला. रावणाला चारही वेदांचे सखोल ज्ञान होते. विशेषतः सामवेदावर त्याचे अद्वितीय प्रभुत्व होते. उपनिषदे, ज्योतिषशास्त्र, शस्त्रविद्या यामध्ये तो पारंगत होता. संगीत क्षेत्रातही रावणाचा नावलौकिक होता. त्याने रचलेले शिवतांडव स्तोत्र आजही संपूर्ण जगात श्रद्धेने पठण केले जाते.

भक्तीच्या क्षेत्रातही राजा रावण उच्च कोटीचा शिवभक्त होता. त्याच्या अपार भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी स्वतःची चंद्रहास तलवार त्याला प्रदान केली होती. एवढे ज्ञान, शक्ती आणि भक्ती असूनही रावण खलनायक का ठरला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

यामागील मुख्य कारण म्हणजे अहंकार. “माझ्यासारखा शक्तिशाली कोणीच नाही” हा भ्रम रावणाच्या पतनाचे मूळ ठरला. विद्वान असूनही स्त्रियांचा अनादर करणे, पतिव्रता सीतेकडे कामासक्त दृष्टीने पाहणे आणि संयम गमावणे — हेच गुणधर्म रावणाला खलनायक ठरवतात.

राजा रावणाजवळ ज्ञानाची कमतरता नव्हती, शक्तीची कमतरता नव्हती, विवेकही कमी नव्हता; कमी होता तो संयम. आणि संयमाचा अभावच त्याच्या विनाशाचे कारण ठरला.

याउलट प्रभू श्रीराम केवळ शक्तिशाली होते म्हणून सर्वश्रेष्ठ ठरले नाहीत, तर ते संयमी, धर्मनिष्ठ आणि मर्यादापुरुषोत्तम होते म्हणून त्यांनी आदर्श निर्माण केला.

👉 या कथेतून मिळणारा संदेश स्पष्ट आहे — ज्ञान, शक्ती आणि भक्ती यांना जर संयम आणि धर्माची साथ नसेल, तर त्यांचे रूपांतर अहंकारात होते. आणि अहंकारच पतनाला कारणीभूत ठरतो.

🗞️ दिनप्रभा | विचारांना दिशा देणारे सत्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

Exit mobile version