तेर | प्रतिनिधी
श्री संत मानकोजी महाराज बोधले यांचे वंशज तथा पंढरपूरकर ह.भ.प. श्रीगुरु प्रभाकर बोधले महाराज यांना वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने वैराग्य महामेरू सेवारत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील तेर येथे आयोजित धार्मिक व सांस्कृतिक महोत्सवात हा सन्मान सोहळा पार पडला. या वेळी वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. रघुनंदन महाराज पुजारी, महामंडलेश्वर, तेर व परिसरातील ग्रामस्थ, वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महोत्सवात शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ह.भ.प. अमृत महाराज जोशी, ह.भ.प. रघुनंदन महाराज पुजारी, ह.भ.प. आकाशकृष्ण महाराज शास्त्री, ह.भ.प. विजय महाराज डक, ह.भ.प. शुभम महाराज लोकरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कीर्तन, प्रवचन व धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.
वारकरी संप्रदायातील सेवाभाव, अध्यात्मिक कार्य व समाजप्रबोधनासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ह.भ.प. बोधले महाराज पंढरपूरकर यांना वैराग्य महामेरू सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे
