आज समाजाकडे पाहिलं की एक विचित्र विसंगती जाणवते.
नावं मोठी झाली आहेत, घोषणा मोठ्या झाल्या आहेत,
पण माणूस मात्र छोटा होत चालला आहे.
गावा-गावात श्याम दिसतो—
बोलण्यात गोडवा, वेषात आकर्षण,
पण कौशल्य, शिस्त आणि कर्तव्याची रामरेषा
ओलांडण्याचं धाडस कुणीच करताना दिसत नाही.
घराघरात कैकयी वाढत आहेत—
स्वार्थ, अहंकार आणि अधिकाराची भूक
नात्यांवर मात करत आहे.
आई असते, पण वात्सल्य कमी पडतं;
घर असतं, पण समाधान हरवतं.
गल्लीबोळात देवानंद दिसतो—
केस वाढवलेला, घोषणाबाज,
स्वतःला क्रांतीचं प्रतीक समजणारा.
पण ज्ञानाचा झरा अखंड वाहणारा
विवेकानंद मात्र शोधूनही सापडत नाही.
आज प्रश्न हा नाही की तरुण बिघडला का,
प्रश्न हा आहे की आपण आदर्श देतो आहोत का?
समाजाचं हे चित्र त्या सोन्याच्या दुकानासारखं आहे,
ज्याच्या बाहेर मोठा झगमगता बोर्ड लावलेला असतो—
“शुद्ध सोन्याचं दुकान”
आणि आत मात्र चप्पल विक्री सुरू असते.
ग्राहक फसतो, विश्वास तुटतो,
आणि दोष मात्र काळावर टाकला जातो.
हेच आज माणसाचं झालं आहे.
शरीरावर माणूस नावाचा बोर्ड लावलेला आहे,
पण कृती मात्र जनावरासारखी—
स्वार्थासाठी, सोयीसाठी, शक्ती दाखवण्यासाठी.
समाज बदलायचा असेल तर
घोषणांनी नाही,
पोस्टरांनी नाही,
तर आचरणाने बदलायला लागेल.
एकतर बाहेरचा बोर्ड बदला—
म्हणजे खोट्या प्रतिमा, ढोंगी आदर्श,
पोकळ घोषणा काढून टाका.
नाहीतर आतलं मूल्य बदला—
संवेदनशीलता, विवेक, जबाबदारी
आणि माणूसपण जपा.
कारण समाज वाचवणारे
फक्त श्याम नसतात,
तर राम असतात.
फक्त देवानंद नसतात,
तर विवेकानंद असतात.
आणि इतिहास सांगतो—
समाजाचं भवितव्य
बोर्डवर नाही,
तर माणसाच्या आत असतं.
✍️ – संपादकीय विभाग
दिनप्रभा
डॉ. किरण बोधले (9730347449)
लेखक, वक्ते व विचारमंथनकार
सदर – कथा आणि कारण
