महाभारत हे केवळ एक युद्धकाव्य नाही; ते मानवी स्वभाव, सत्ता, अहंकार आणि धर्म-अधर्म यांचा आरसा आहे. या युद्धाच्या आधी घडलेली भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई ही भारतीय इतिहासातील आणि संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची नैतिक घटना आहे. शांततेचा मार्ग उघडा ठेवूनही युद्ध अटळ कसे होते, याचा हा जिवंत दाखला आहे.
महाभारतासारख्या भीषण युद्धाच्या उंबरठ्यावर पांडवांच्या सभेत चर्चा सुरू होती. तेव्हा भीमाने स्पष्ट शब्दांत विचारले — “कृष्णा, तू दुर्योधनाकडे का जात आहेस? तो तुझं ऐकणार आहे का?” भीमाचा प्रश्न वास्तववादी होता, पण कृष्णाचं उत्तर इतिहास घडवणारं ठरलं.
श्रीकृष्ण म्हणाले, “भीमा, मला माहीत आहे दुर्योधन ऐकणार नाही. पण शिष्टाई करणं आवश्यक आहे. कारण शास्त्र सांगतं — युद्धापूर्वी शिष्टाई झाली आणि ती ज्याने मोडली, त्या व्यक्तीच्या माथ्यावर युद्धातून निर्माण होणाऱ्या सर्व पातकांचा भार जातो.”
युद्ध म्हणजे केवळ रणांगणावरील पराभव-विजय नव्हे. युद्धात असंख्य योद्धे मारले जातात, स्त्रिया विधवा होतात, मुलं अनाथ होतात. या साऱ्या विध्वंसातून जे पाप तयार होतं, त्याची जबाबदारी शिष्टाई मोडणाऱ्यावर येते. म्हणूनच श्रीकृष्ण शांतिदूत म्हणून मुद्दाम दुर्योधनाकडे गेले — धर्माच्या बाजूने उभं राहण्यासाठी आणि अहंकाराला इतिहासासमोर उघडं पाडण्यासाठी.
दुर्योधनासमोर कृष्णांनी प्रथम न्यायाचा प्रस्ताव मांडला — पांडवांना त्यांच्या हक्काचं राज्य द्या. दुर्योधनाने तो धुडकावला. मग अर्धराज्याचा प्रस्ताव मांडण्यात आला; तोही नाकारण्यात आला. अखेरीस कृष्णांनी अत्यंत मवाळ आणि समंजस प्रस्ताव ठेवला — “पाच पांडव आहेत. प्रत्येकी एक गाव दिलं, तरी ते समाधान मानतील.”
कृष्णांनी पाच गावांची नावे सांगितली — इंद्रप्रस्थ, स्वर्णप्रस्थ, पाणीप्रस्थ, तिलप्रस्थ आणि व्याघ्रप्रस्थ. हे ऐकताच सभेत उपस्थित असलेल्या शकुनीची कूटनीती जागी झाली. त्याने ओळखलं की ही पाच गाव सामान्य नाहीत. आजच्या काळात तुलना करायची झाली तर ही गाव मुंबई, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर आणि सुरतसारख्या महत्त्वाच्या केंद्रांसारखी होती. ही गाव दिली, तर सत्तेचा कणा मोडेल.
याच क्षणी दुर्योधनाचा अहंकार पूर्णपणे जागृत झाला. त्याने इतिहासात कोरलं जाणारं वाक्य उच्चारलं — “पाच गाव तर दूरच, मी पांडवांना सुयेच्या अग्रभागावर बसेल इतकी जमीनसुद्धा देणार नाही.”
या एका वाक्याने शांततेचे सर्व दरवाजे बंद झाले. शिष्टाई मोडली गेली आणि महाभारतासारखं भीषण युद्ध अटळ ठरलं. या युद्धात केवळ कौरव आणि पांडवांचे योद्धे मारले गेले नाहीत, तर संपूर्ण कुरुवंश नष्ट झाला. अहंकाराने घेतलेला निर्णय केवळ त्या काळापुरता मर्यादित राहिला नाही; त्याने संपूर्ण वंशाचा आणि युगाचा अंत केला.
ही कथा आजच्या समाजालाही तितकीच लागू पडते. संवादाचा मार्ग खुला असताना अहंकार निवडला, की विनाश अटळ असतो. श्रीकृष्णांनी धर्माचं कर्तव्य पार पाडलं, पण दुर्योधनाने अहंकाराची वाट धरली — आणि इतिहास रक्तरंजित झाला.
भारतीय इतिहास, संस्कृती आणि मूल्यांची अशीच अर्थपूर्ण मांडणी वाचण्यासाठी दिनप्रभा आणि ‘कथा आणि कारण | By डॉ. किरण’ या उपक्रमाशी जोडलेले राहा.
डॉ. किरण बोधले 9730347449
लेखक, वक्ते व विचारमंथनकार
सदर – कथा आणि कारण
