श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यापूर्वी विशिष्ट प्रकारची आध्यात्मिक तयारी आवश्यक असते. या तयारीसाठी अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या चार तत्त्वांचा विचार केला जातो. या तत्त्वांचे विवेचन करताना डॉ. जयवंत महाराज सांगतात की, कथेचा अधिकारी कोण असावा, तिचा केंद्रबिंदू काय असावा, आणि त्यामागचे प्रमुख उद्देश कोणते असावेत, हे आधी स्पष्ट असावे. प्रयोजन सांगताना, एक गौण प्रयोजन आणि दोन मुख्य प्रयोजनांचे सम्यक ज्ञान असणे आवश्यक आहे.
नारदजी सनतकुमारांना विचारतात की, या भागवत कथेचे महात्म्य इतके व्यापक आहे की, तिच्या व्रताचरणाचे नेमके नियम कोणते असावेत हे समजणे महत्त्वाचे आहे. यावर उत्तर देताना सनतकुमार म्हणतात की, कथेचे व्रत हे नित्यस्वरूपाने स्वीकारले गेले पाहिजे. जीवनात कितीही प्रतिकूलता आली तरी, त्या व्रतापासून डगमगू न देता, मनात प्रबळ श्रद्धा व दृढ संकल्प ठेवून, त्या व्रताचे यथायोग्य पालन व्हावे हीच खरी भावना असावी.
कथा कोणत्या स्थळी करावी, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले आहे. तीर्थक्षेत्र, मंदिरे, वनक्षेत्र किंवा स्वतःच्या घरातसुद्धा कथा होऊ शकते, पण स्थळ पवित्र, शांत आणि प्रशस्त असावे. कथेचा वक्ता विशिष्ट आध्यात्मिक गुणांनी युक्त असावा. त्याच्या जीवनात विरक्तता असावी, तो वैष्णव वृत्तीचा असावा. त्याचे वागणे संन्यासीवृत्तीचे असावे, वेदशास्त्राचा अभ्यास केलेला असावा, दृष्टांत सांगण्यात कुशल असावा आणि त्याच्या वाणीमध्ये ओज, सात्त्विकता आणि स्थैर्य असावे.
वक्ता पंडित असला तरी धर्माबाबत त्याची श्रद्धा अढळ असावी. त्याच्या वागण्यात दोष नसावेत. तो स्त्रीलंपट, पाखंडी अथवा संदेहवादी नसावा. कारण अशा वक्त्याच्या कथेला आध्यात्मिक परिणाम मिळत नाही. आणि जसे वक्त्याचे शुद्ध आचरण आवश्यक आहे, तसेच श्रोत्यांच्या मनातही पूर्ण भक्तिभाव, सद्भावना आणि परमेश्वरचरणी शरणागती असावी.
या कथेचे प्रभावी वर्णन करताना नारदजी पुढे म्हणतात, “आज माझे जीवन धन्य झाले.” कारण शुकाचार्य कथा सांगत असताना, प्रल्हाद टाळ वाजवत आहेत, राजा परीक्षित कथा श्रवण करत आहेत, उद्धव झांज वाजवत आहेत, नारद स्वतः वीणेवर भजन म्हणत आहेत, अर्जुन भक्तिपूर्ण चाली गात आहे, इंद्र मृदंगाचा नाद करीत आहे आणि सनतकुमार जयजयकार करत आहेत. अशी ही भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली श्रीमद्भागवत कथा केवळ ज्ञानाचे नव्हे, तर मुक्तीच्या मार्गाचेही द्वार उघडणारी असते.
